भवानीनगर ता 20 : सणसर (ता. इंदापूर ) येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पुणे जिल्हा अध्यक्ष श्री दिलीप मारुती निंबाळकर यांची जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य पदी निवड झाली आहे.
निंबाळकर हे गेली वीस वर्षापासून अखिल भारतीय ग्राहक पंचायत या देशव्यापी स्वयंसेवी संघटनेत काम करत आहेत. ग्राहक पंचायतीचे सनसर चे गाव संघटक ते पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. मागील तीन वर्षापासून ते जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. जिल्ह्यातील तेराही तालुक्यात ग्राहक पंचायतिचे काम गावोगावी पोहोचेल असे त्यांचे प्रयत्न आहेत. ग्राहकांच्या वेगवेगळ्या प्रश्नात त्यांनी ग्राहकांना न्याय द्यायचे काम केले आहे. अनेक विधायक उपक्रम,व्यापक जनहिताच्या दृष्टीने विविध प्रश्नांची सोडवणूक करून ग्राहकांवरील अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
फसव्या जाहिराती,बोगस साखळी पद्धतीचा व्यवसाय, आरोग्य, बांधकाम विभाग अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी ग्राहकांमध्ये जागृती करून फसवणुकीपासून संरक्षण दिले आहे.नुकताच त्यांनी दहा रुपयाच्या कॉइन चा विषय हाताळून त्याची जिल्हाभर व्याप्ती होऊन प्रश्न सुटला. ग्राहकाला स्वतः प्रश्न सोडवता आला पाहिजे यासाठी ते ग्राहकांना मार्गदर्शन करत असतात. आगामी काळात प्रशासनाच्या सहकार्याने ग्राहकांच्या असणाऱ्या समस्या सोडवून ग्राहकांना न्याय देण्याचे काम केले जाईल. असे दिलीप निंबाळकर यांनी सांगितले. निंबाळकर यांच्या निवडीने सामान्य ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांच्या माध्यमातून सामान्य शेतकरी, ग्राहकांचे प्रश्न सुटण्यात मदत होणार आहे.