शेटफळगढे ता. 30 : लाकडी (ता. इंदापूर) येथे एका कार्यक्रमात उपस्थित एकाने मामा तुम्ही खासदार व्हा असे म्हणाले. त्यावर आमदार दत्तात्रय भरणे यांनी माझे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ठरले आहे. हे मी जाहीर न सांगता एकांतात व योग्य वेळ आल्यावर मीही सांगेन व तुम्हालाही समजेल. असे श्री भरणे यांनी उपस्थितांना सांगितले. त्यामुळे नेमके श्री भरणे व श्री पवार या दोघांच्यात लोकसभेला नेमकं काय ठरलय ? याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर श्री भरणे हे अजित पवार यांच्या गटात सहभागी झाले अशातच बारामती लोकसभेची जागा अजित पवार गट लढवणार असल्याचे श्री पवार यांनी स्वतः जाहीर केले आहे. त्यामुळे बारामती लोकसभेच्या उमेदवारीसाठी श्री पवार यांच्या विश्वासू सहकार्यांपैकी जी नावे चर्चेत आहेत. त्यात उमेदवारीसाठी दत्तात्रय भरणे यांचे नावही प्राधान्याने घेतले जात आहे. त्यामुळे श्री भरणे यांच्या आजच्या कार्यक्रमात केलेल्या या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
लाकडी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना श्री भरणे पुढे म्हणाले मी जिल्हा बँकेचा संचालक, आमदार, मंत्री, हे उपमुख्यमंत्री श्री पवार यांच्यामुळे झालो आहे. त्यामुळे अजित दादा जो निर्णय घेतील तो मान्य असेल. ज्याप्रमाणे अजितदादा यांच्या सोबत जाऊन त्यांना मी साथ देण्याचा निर्णय विकासासाठी व जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी घेतला आहे. त्याचप्रमाणे जनतेनेही मी विकास कामांसाठी देत असलेल्या निधी व जनतेची करत असलेल्या कामे लक्षात घेऊन अजितदादा जो निर्णय घेतील तो मान्य करत लोकसभेला व विधानसभेला गावातून आपण जास्तीत जास्त मतदान करून उतराई करा. असे श्री भरणे यांनी उपस्थितांना केले.
तसेच लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजनेचेही लवकरात लवकर काम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सुरू होईल.. खडकी भवानीनगर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम झाल्यामुळे येथील वाहतुकीला गती मिळून दळणवळणाचा प्रश्न सुटला आहे. त्याचबरोबर रोजगाराचाही प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे. आगामी काळातही गावच्या विकासासाठी केवळ आपणच निधी देऊ शकतो. असे सांगत असे सांगत लोकसभेला व विधानसभेला जास्तीत जास्त गावातून मतदान करा असे आवाहन श्री भरणे यांनी यावेळी उपस्थितांना केले.