*सागवानी बैलगाडी*
तानाजी काळे,पळसदेव ..
(लेखक गेल्या 32 वर्षापासून अग्रगण्य दैनिकाचे तालुका प्रतिनिधी म्हणून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत)
——————————————-
आज सहज जूना अल्बम चाळताना ,या फोटोवर माझं मन स्थिरावलं . … आणि भूतकाळातल्या चाळीस वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या.
हा घरच्या गाईचा खोंड.. हौशा त्याचं नाव. माझ्या पसंतीने ठेवलेले.
रुबाबदार, देखणा, आखीव- रेखीव शरीर सर्व गुणसंपन्न. “खिल्लार “जातीचा असल्यामुळे सावधही तितकाच .
मला शेतीच्या मशागतीचे धडे शिकवण्यात या हौश्याचा सिंहाचा वाटा.. तो ही नव्यानेच शेतीकाम शिकत होता. आणि मी ही. जणू एकाच शिवळेला आम्ही दोघे जुंपलेलो. वडील आबा.. शेती व्यवसायातले, बैलगाड्यातले दर्दी माणूस.
सागवानी चाकजोडाची बैलगाडी आणायची हे माझ्या वडिलांचे स्वप्न होतं. त्या काळातील प्रत्येक शेतकऱ्याचं किंबहुना असंच काही स्वप्न असायचं .ते स्वप्न साकार करण्यासाठी ती पीढी रात्रंदिवस काबाडकष्ट करायची.
या हौशा बैलाची व आबांची हौस पुर्ण करण्यासाठी भिवंडी वरून माझे फौजदार बंधू दादासाहेबांनी स्वतःला बुलेट मोटारसायकल घेण्याअगोदर वडिलांना बैलगाडीला सागवानी चाकजोड आणून दिला होता.
आबांनी बैलगाडीला नवी साटी बांधून घेतली.
आमच्या पळसदेव गावच्या आठवडी बाजाराचा सोमवार उजाडला.
सकाळ -सकाळ आबांनी बैलपोळ्याला ज्या पध्दतीने बैल धुतात, तशी बैलं स्वच्छ धुतली.बैलाच्या वशिंडीवर जोतिबाचा गुलाल टाकला. बैलांना पुरेशी वैरण घेतली. न्याहरी उरकली. नेहमीप्रमाणे लाल ( पालकोलचा) रेशमी फेटा डोक्याला बांधला. त्यांची डोक्याला फेटा बांधायची कोल्हापुरी स्टाईल होती. आज फेट्याची कोच जरा दोन बोटं जास्तच निघाली होती.
बाजाराच्या पिशव्या बैलगाडीच्या खुंटल्याला अडकवल्या. बैलाचा आसुड खांद्यावर टाकला , कासरा घेऊन बैलाच्या दावणीकडे जाईपर्यंत दोन्ही बैलं पटापट उठली .आबांनी बैलाला कासरा लावला. तोपर्यंत माझ्या आईने घरातून बैलांच्या पितळी घुंगूरमाळा आणून दिल्या. माळा पाहून बाप दिलखुलास हासला. बैलांच्या गळ्यात माळा अडकवल्या.
घुंगूरमाळाच्या आवाजाने बैलांनाही बापाच्या वर उत्साह आला होता. बैलंही कावरीबावरी होऊन गाडीला जुंपून घेण्यास आतूर झाली होती. आबांनी बैलगाडीचे जू उचलले तसे सवयीने दोन्ही बैलांनी आपल्या माना खाली वाकवून जू खांद्यावर घेतले. बैलांच्या जुंपण्यांना आबांनी खिळ अडकवली. दोन्ही खिळा नीट बसल्यात का त्याची पुन्हा खात्री केली. नवी बैलगाडी बाजारला चालल्याचे पाहून वस्तीवरील आजुबाजुचे चार बाजारला जाणारे बाजारकरीही बैलगाडीत बसले.
बैलांचा कासरा हातात हातात घेऊन, चाकाच्या आरीवर पाय देऊन आबा गाडीत बसले. बैलांना हं… म्हणस्तोर गाडी रस्त्याला लागली. मी आपला एकटाच सायकलवर बैलगाडीच्या मागे -पुढे एखाद्या मंत्र्याला दिमाखात बंदोबस्तात न्यावं. तसा बंदोबस्त ठेवत जात होतो.
बापाचा आनंद गगनात मावेना. चेहऱ्यावरचा उत्साह न सांगता येणारा. बैलगाडीत मांडीवर पायाची तिडी मारून त्यांची बसण्याची स्टाईल वेगळीच होती.पाच मिनिटात बैलगाडी पुणे- सोलापूर हाववेला लागली बाकीचे बाजारकरीही सावरून व सावध बसले होते. कदाचित त्यांनाही पुढचा अंदाज असावा.
हौशा नंद्यानी आता पावंड धरला होता. त्यांच्या गळ्यातील घुंगूरमाळाही पावंडाच्या चालीने लयबद्ध वाजत होत्या. त्या जोडीला सागवानी चाकांचा खाड…खाड..खाडखाड. आवाज…….गाडी नजरेआड होईपर्यंत माझी आई बैलगाडी पहात अंगणातच उभी होती.
रस्त्याने येणारे जाणारे बैलगाडीकडे माना वळवू – वळवू पहात होते. आबांना हात करीत होते. हे दृश्य पाहून मलाही बापाचा अभिमान वाटत होता.
आता पळसदेव गाव जवळ आले होते. बाजारात लोक जमू लागले होते.
श्री.पळसनाथ मंदीरासमोर बैलगाडी आली. आबांसह बैलगाडीत बसलेल्या साऱ्या जणांनी मनोभावे पळसनाथाला हात जोडले गाडी पुढे चालू लागली. गाडी बाजारात आली. गाडी सोडायला जागा पाहून, आबांनी गाडी उभी केली.बाजारकरी गाडीतून उतरले. एका हातात कासरा घरून, धोतराचा सोगा दाताखाली धरत खुंटल्याच्या आधाराने आबा चाकाच्या आरीवर पाय ठेवून बैलगाडीतून खाली उतरले.बैलं जू ला दोन्ही बाजूंनी बांधली. बैलांना वैरण टाकोस्तोर एक- एक करीत बाजारातले सारे शेतकरी बैलगाडी भोवती गोळा झाले. सापवाल्याचा खेळ पहावा तसे गोल वेढा मारून लोक थांबले होते . चाकजोडाची किंमत विचारात होते . बापही अभिमानाने सांगत होता. त्यावेळेस एक तोळा सोन्याची किंमत सागवानी चाकजोडाला मोजली होती.
. आज इम्पोर्टेड नव्या “चारचाकी” गाडीलाही इतके लोकं गोळा होत नाहीत….. गेले ते दिवस..राहिल्या त्या आठवणी.