शेटफळगढे ता 24 : : मुदत संपण्याच्या दोन दिवस अगोदर ग्रामपंचायत शिंदेवाडी (ता. इंदापूर) येथील सरपंच सावता कृष्णा बोराटे यांच्यावर पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कामकाजातील अनियमितता, कर्तव्यात कसूर व पदाचा गैरवापर करून कामकाज केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली. त्यांचे सरपंच पद व सदस्य पद काढून घेण्यात आलेले आहे. याबाबतचा आदेश 18 जुलै 2023 रोजी देण्यात आला आहे
या ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत कार्यकारी मंडळाचा कार्यकाल 21 जुलै 2018 ते 20 जुलै 2023 पर्यंत आहे केवळ दोन दिवस कार्यकाल पूर्ण करण्यास बाकी असताना सरपंच पदासह सदस्य पद रिक्त करण्याची घटना इंदापूर तालुक्यातील शिंदेवाडी येथे घडली आहे.
याबाबत ग्रामपंचायत सदस्य शोभा अजिनाथ शिंदे यांनी कारवाईबाबत तक्रार केली होती. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने केलेल्या चौकशीचे विविध अहवालांचे संदर्भ देण्यात आले आहेत. व त्या संदर्भातील सर्व अहवाल घेतला आहे सावता बोराटे हे सरपंच म्हणून कार्यरत असताना त्यांनी दि. ९ सप्टेंबर २०२० ते २० सप्टेंबर २०२० या कालावधीत ते रजेवर असतानाही दि. २१ सप्टेंबर रोजीच्या सभेचे सुचनापत्र काढून नियमबाह्य कामकाज करणे, दि. २६ ऑक्टोबर २०२० रोजीची सभा तहकूब करून त्यानंतर ती सभा दि. २८ ऑक्टोबर २०२० रोजी आयोजित करण्यात आली. ती सभाही तहकूब करून पुन्हा दि. ३१ ऑक्टोबर २०२० रोजी आयोजित करून नियमबाह्य कामकाज करणे, उपसरपंच निवडीची सभा ९ ऑक्टोबर २०२० रोजी बोलावून कोरोनाचा कारण देऊन रजेवर जाऊन ती सभा तहकूब केली व दुसऱ्या दिवशी आयोजित न करता कर्तव्यात कसूर झाल्याचा त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
अशा अनेक बाबीमध्ये अनियमितपणा झाल्याचे दिसून आल्याने याबाबतची, कारवाई करण्यात आली आहे. केवळ दोन दिवस बाकी असताना कारवाई झाल्याने व सार्वत्रिक निवडणूक घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाले आहेत.