डॉ. संदेश शहा, इंदापूर
इंदापूर : २९ :इंदापूर नजीक वनगळी येथील एस. बी. पाटील ग्रुप ऑफ स्कूल मध्ये धनगर समाजातील १०० विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते पाचवी मध्ये इंग्रजी माध्यमासाठी चालू शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये मोफत निवासी शिक्षणासाठी प्रवेश दिला जात आहेत. सदर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता बारावी पर्यंतचे मोफत निवासी शिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष तथा माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी वनगळी येथे पत्रकार परिषदेत दिली..
श्री. पाटील पुढे म्हणाले, प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार आहे. अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय, डिजिटल क्लासरूम, निसर्गरम्य परिसर व वातावरण, शाळा, परिसरात सी.सी.टी.व्ही तसेच जेईई, नीट, एमपीएससी, यूपीएससी ची पूर्वतयारी आदी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शिक्षण हे प्रगतीसाठी एकमेव प्रभावी साधन असल्याने धनगर समाज बांधवांनी या समाज कल्याण विभागाच्या मोफत निवासी शिक्षण योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, ग्रामीण विद्यार्थ्यांना तालुक्यातच दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे या हेतूने सन २००८ मध्ये शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान संचलित एस. बी. पाटील शैक्षणिक संकुलनाची निर्मिती करण्यात आली. त्याचा शैक्षणिक उद्देश यशस्वी झाल्याचे समाधान आम्हांस आहे. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, इंदापूर, श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी, बावडा व शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानचे एस. बी. पाटील शैक्षणिक संकुल मध्ये सध्या सुमारे ३६ हजार विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत आहेत. येथे शिकलेले हजारो विद्यार्थी सध्या देशपरदेशात उच्च पदावरती कार्यरत आहेत
. एस. बी. पाटील शैक्षणिक संकुला मध्ये सध्या नर्सरी पासून अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र पदवीपर्यंत सर्व शिक्षणाच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या शैक्षणिक संकुलमध्ये इंटरनॅशनल स्कूल, पब्लिक स्कूल, ज्युनियर कॉलेज, इंजिनियरिंग कॉलेज, फार्मसी कॉलेज आदी अभ्यासक्रमांची दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आगामी काळात एस. बी. पाटील शैक्षणिक संकुल मध्ये एस. सी., एस. टी. विद्यार्थ्यांसाठी निवासी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. या शैक्षणिक संकुलमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांस विविध शिष्यवृत्या दिल्या जात आहेत. त्याचप्रमाणे मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांचे स्मरणार्थ या शैक्षणिक संकुल मध्ये पदवी घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास पाच हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येत असल्याचे पाटील यांनी सांगितले.
यावेळी बाबासाहेब चवरे, विलासराव वाघमोडे, बाबा महाराज खारतोडे, जयकुमार कारंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोफत निवासी सुविधा उपलब्ध करून दिलेबद्दल हर्षवर्धन पाटील यांचा तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, विलासराव वाघमोडे, बाबासाहेब चवरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माऊली चवरे, महेंद्र रेडके, माऊली वाघमोडे, गजानन वाकसे, दादासाहेब पिसे आदी मान्यवर उपस्थित होते.
———————————
फोटो:- वनगळी-इंदापूर येथे एस. बी. पाटील शैक्षणिक संकुला समोर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार करताना धनगर बांधव.