भवानीनगर ता. 30 : वेगवेगळ्या सामाजिक कार्यामध्ये आपल्या इंदापूर तालुक्याचा नेहमीच सक्रिय सहभाग असतो.कोरोना महामारी सारख्या संकटामध्ये सुध्दा जेव्हा राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता,तेव्हा आपण एकट्या इंदापूर तालुक्यातून जवळपास १२ हजार बाटल्यांचे संकलन करून सामाजिक बांधिलकी जोपासली होती.त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा रक्तदान शिबिरे ही एक लोक चळवळ बनून अडचणीच्या काळामध्ये गरजू रुग्णाला उपयोगी ठरावी असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले..
सणसर ता.इंदापूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सरपंच पार्थ निंबाळकर आणि मित्र परिवाराने आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आमदार भरणे बोलत होते.या कार्यक्रमास छत्रपतीचे चेअरमन प्रशांत काटे,संचालक बाळासाहेब पाटील,जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकळ,सरपंच पार्थ निंबाळकर,राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर,माजी सरपंच यशवंत पाटील,शिवाजी सपकळ,तुषार सपकाळ,महेश सपकळ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले की,पार्थ निंबाळकर आणि त्यांच्या टीमने अनावश्यक खर्चाला फाटा देऊन रक्तदान शिबिरासारख्या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.खरे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या सामाजिक कार्यामध्ये आघाडीवर असतो.तसेच आपल्या पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांच्या वाढदिवसांचे औचित्य साधून किंवा विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने आरोग्य शिबिरे तसेच रक्तदान शिबिरे आयोजित करून गोरगरिब रुग्णांना मदत करत असतो.या शिबिरांच्या आयोजनामुळे ग्रामीण भागातील असंख्य गोरगरीब आणि गरजू रुग्णांना खूप मोठा फायदा होत आहे.
श्री.भरणे पुढे म्हणाले की,आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाच्या आरोग्य विषयक अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.त्यामुळे अडचणीच्या काळात गोरगरीब रुग्णांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.अशा परिस्थितीमध्ये आरोग्य शिबिरे तसेच रक्तदान शिबिरे ही लोक चळवळ होऊन गरजू रुग्णांना आधार बनावीत,अशी अपेक्षा शेवटी आमदार भरणे यांनी व्यक्त केली.या शिबिरामध्ये सहभागी होत शेकडो दात्यांनी रक्तदान केल्याबद्दल आमदार दतात्रय भरणे यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.