भवानीनगर ता. 30 : इंदापूर तालुक्यातील अनेक होतकरू तरूण-तरूणी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करत असून त्यांनी सामान्य माणूस केंद्रबिंदु माणून गोरगरिबांचे अश्रू पुसण्यासाठी आपल्या पदाचा वापर करावा,असे आवाहन माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
सपकळवाडी ता.इंदापूर येथील श्री.किरण शंकर सपकळ यांची उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल आज त्यांचा माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,यावेळी आमदार भरणे बोलत होते.ते म्हणाले की,आपल्या इंदापूर तालुक्यातील असंख्य तरूण-तरूणी विविध स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून अतिशय खडतर प्रवासातून मोठ-मोठ्या पदावर विराजमान होऊन उत्तम पद्धतीने प्रशासकीय सेवा बजावत आहेत
.त्यामुळे आपल्या इंदापूरचा नावलौकीक वाढत असून अलीकडच्या काळामध्ये तर इंदापूर तालुक्यातील शेकडो परीक्षार्थी गुणवत्ता यादीत चमकत आहेत.यामध्ये खऱ्या अर्थाने शेतकरी कुटूंबातील गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे.त्यामुळे आता शहरातील युवकांबरोबरच आमच्या ग्रामीण भागातला युवकही स्पर्धा परीक्षांमध्ये बरोबरीने यश संपादन करत असल्याने याचा निश्चितपणे आनंद असून किरण तु ही प्रशासकीय सेवा बजावताना नेहमी सामान्य माणसाचे हित जोपासून गोरगरिबांची सेवा कर,अशा प्रकारच्या शुभेच्छा आमदार भरणे यांनी श्री.सपकळ यांना दिल्या.
या प्रसंगी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत काटे,छत्रपतीचे माजी व्हा.चेअरमन बाळासाहेब पाटील,जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकळ,सणसरचे सरपंच पार्थ निंबाळकर,तुषार सपकळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.