शेटफळगढे ता.३१ : खडकवासला कालव्यातून इंदापूर तालुक्यातील शेती सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात आलेले आवर्तन सात दिवस चालणार आहे.
सध्या तालुक्यात पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पिके जवळपास जळून जाण्याच्या मार्गावरती होती . उसाच्या लागणी देखील झालेले नव्हत्या. तसेच विहिरी व कुपनलिका यांचेही जलस्त्रोत कमी पडल्याने सध्या शेतात उभ्या असणाऱ्या उसासारख्या पिकांनाही पाणी देणे मुश्किल झाले होते.
मात्र सध्या खडकवासला धरणामध्ये जवळपास 90 टक्के पाणी झाले होते. त्यामुळे जलसंपदा विभागाने इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी 24 जुलैपासून आवर्तन धरणातून सोडण्यात आले होते हे आवर्तन तालुक्यात नुकतेच पोचले आहे.
मात्र तालुक्यात हे आवर्तन यापुढे सात दिवस राहणार आहे. केवळ पिण्याच्या पाण्यासाठी व शेती सिंचनासाठी पाणी दिले जाणार आहे. तसेच खरिपासाठी जलसंपदा विभागाकडे शेती सिंचनासाठी पाणी मागणीचेही प्रमाण शेतकऱ्यांकडून कमी आहे.
. या सात दिवसानंतर कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या दौंड व बारामती तालुक्यातही पाऊस नसल्याने या दोन्ही तालुक्यात तसेच जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेला सात दिवसानंतर पिण्याच्या पाण्यासाठी पाणी दिले जाणार आहे.
त्यानंतर उजनी धरण 50 टक्के प्लस झाल्यावर तसेच खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा विचारात घेतला जाणार आहे. त्यानंतरच इंदापूर तालुक्यातील खडकवासला प्रकल्पाच्या अंकित येणाऱ्या पाझर तलावात पाणी सोडावयाचे की नाही याबाबतचा निर्णय जलसंपदा विभागाच्या वतीने घेतला जाणार आहे.
——————————-