शेटफळगढे ता. 18 : बारामती भिगवण रस्त्याचे कोणतीही भूसंपादन झालेले नाही. त्याबाबत बारामतीच्या प्रांत कार्यालयाने आमच्या कार्यालयामार्फत या रस्त्यासाठी भूसंपादन झाले नाही अशा आशयाचे लेखी पत्र शेतकऱ्यांना दिले आहे..
तरी देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करून बेकायदेशीरपणे रस्ता करण्यास सुरुवात केली आहे. सध्या ही बाब न्यायप्रविष्ठ असून बांधकाम विभाग शेतकऱ्यांवरती अन्याय करत आहे. त्यामुळे तात्काळ या रस्त्याचे काम थांबवण्यात यावे. अशी मागणी शेतकरी अनिल सूर्यवंशी व इतर आठ शेतकऱ्यांनी बांधकाम विभागावर आरोप करीत केली आहे.
अनिल नामदेव सुर्यवंशी व इतर 8 शेतकरी यांच्या मालकीच्या मौजे शेटफळगढे येथील गट नंबर 303 मधील शेत जमिनीवर बांधकाम विभागाने विना परवाना अतिक्रमण करून बेकायदेशीरपणे रस्त्याचे काम चालू केले आहे.
वास्तविक रस्त्याची संयुक्त मोजणी होणे अपेक्षीत आहे त्यानंतर शेतकऱ्याची सातबारा वरील जमीन भरते किंवा नाही याची खात्री करून रस्त्याचे काम सुरू करणे गरजेचे आहे. परंतु अशी प्रत्यक्षात कोणतीही खातरजमा न करता शेतकऱ्याच्या वैयक्तिक मालकीच्या जमिनीत अतिक्रमण करून बांधकाम विभागाने सध्या रस्त्याचे काम चालू केले आहे तरी ते काम तात्काळ थांबवण्यात यावे अशी मागणी सूर्यवंशी यांनी केली आहे .
याबाबतची लेखी निवेदने बांधकाम विभागालाही दिलेली आहेत तरीदेखील बांधकाम विभाग अतिक्रमण करून रस्त्याचे काम करीत आहे. त्यामुळेे ते काम तात्काळ थांबवावे.