इंदापूर ता.6: इंदापूर तालुक्यातून वाहणाऱ्या निरा नदीचे पात्र व नदीवरील बंधारे सध्या कोरडे ठणठणीत पडलेले आहेत. त्यामुळे नीरा नदीमध्ये वीर धरणातून पाणी सोडण्याचा विषय आपण शनिवारी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये उपस्थित केला असून, नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि.4) केले.
निरवांगी नजीक दगडवाडी येथील प्राचिनकालीन प्रसिद्ध श्री नंदिकेश्वर मंदिरात हर्षवर्धन पाटील यांनी पूजा करून दर्शन घेतले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील बोलत होते.
ते म्हणाले, सणसर कटसाठी त्याकाळी 30 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. मात्र त्यामधून 22 गावांच्या शेतीला खडकवासल्याच्या पाण्याचा एक थेंबही मिळालेला नाही. भाटघरचे 4 टीएमसी पाणी कमी करून ते खडकवासल्यातून देण्याची व्यवस्था सणसर कट म्हणून करण्यात आली आहे. या सणसर कट मधून 22 गावांसाठी हक्काचे 4 टीएमसी पाणी मिळावे असा विषय मी शनिवारी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उपस्थित केला आहे. या 22 गावांना सणसर कट मधून 4 टीएमसी पाणी मिळावे यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
श्री क्षेत्र नंदिकेश्वर मंदिर हे इंदापूर तालुक्याचे वैभव असून या मंदिराच्या जीर्णोद्धार कामासाठी 30 लाख रुपये निधी मी जीर्णोद्धारासाठी जाहिर केला असून त्यामध्ये एक रुपयाही कमी होणार नाही, असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.
चांगला दमदार पाऊस होऊन सर्व जनतेला सुखी समाधानी राहू दे, असे साकडे नंदिकेश्वर चरणी घातल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. यावेळी निरा भिमा कारखान्याचे अध्यक्ष यांना लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, प्रदीप पाटील आदी अनेक मान्यवरांसह कर्मयोगी शंकररावजी पाटील व निरा भीमा कारखान्याचे संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, भाजपचे कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
________________________
• चौकट :- नीरा नदीवर बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी सर्वेक्षण होणार
नीरा नदीवरील अनेक बंधार्यांना गळती होत असल्याने, त्यामध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांचे ऐन उन्हाळ्यात नुकसान होते. त्यामुळे नीरा नदीवरील तावशी ते निरा नरसिंहपर्यंतच्या सर्व बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यासाठी जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानुसार त्यांनी सर्व बंधाऱ्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
———————————
चौकट :- 20 वर्षात 22 गावांमधील शेतीला पाणी कमी पडू दिले नाही
मी सत्तेवर असताना सतत पाठपुरावा करून व राजकीय ताकद वापरून 22 गावांसाठी 7 नंबर फॉर्मवर पाणी मिळवून दिले आहे. आपण मंत्रीपदावर असताना सन 2014 पर्यंत वीस वर्षाच्या कालावधीत कधीही 22 गावांमधील शेतीला पाणी कमी पडू दिले नव्हते. मात्र गेल्या 9 वर्षात 22 गावांमध्ये शेतीला पाणी मिळण्यास अडचणी येत आहेत. याला जबाबदार कोण? असा सवालही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला.
_________________________