इंदापूर ता. 23 इंदापूर तालुक्यातील डिकसळ येथील सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार भगवान गायकवाड यांची इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सोशल मीडिया तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. गुरुवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी इंदापूर येथील शहा संस्कृतीक भवन येथे बारामती लोकसभा मतदारसंघातील संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या वेळी इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. राष्ट्रवादीच्या फुटी नंतर इंदापूर तालुक्यातील बऱ्याच राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी यांनी सत्तेतील अजित पवार गटात सामील होणे पसंत केले होते. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते कोण याविषयी अनेक तर्क वितरक मानले जात होते. परंतु आजच्या मेळाव्यात इंदापूर तालुक्यात शरद पवार यांची मोठी ताकद असल्याचे पहावयास मिळाले. इंदापूर तालुक्यातील युवकांचे आशास्थान व तालुक्यातील प्रत्येक गावात सोनाई परिवाराच्या माध्यमातून प्रचंड जनसंपर्क असलेले पुणे जिल्हा परिषदचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी आजच्या मेळाव्यात आपली उघड भूमिका जाहीर करून आपण लोकनेते शरदचंद्रजी पवार यांच्या गटात असल्याचे जाहीर केल्याने तालुक्यातील सर्व तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केले कित्येक वर्ष इंदापूर तालुकाध्यक्ष राहिलेले महारुद्र पाटील हेही शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व मान्य करून तालुक्यातील शरद पवार यांच्या पाठीमागे कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यासाठी तन मन व धनाने झटत असल्याचे पहावयास मिळत आहे. विजयकुमार गायकवाड हे गेले सलग तीन टर्म इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष राहिले असून त्यांनी त्यांच्या कार्यकाळात पक्षाच्या उमेदवाराला मतदानातून आघाडी देऊन तालुक्यामध्ये फार मोठी तरुणाची फळी निर्माण केली होती त्याचप्रमाणे भिगवण शेटफळ गढे जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये त्यांचा फार मोठा जनसंपर्क आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन आपण शरदचंद्रजी पवार व सुप्रिया सुळे यांच्याबरोबर असल्याचे जाहीर केले होते. पदापेक्षा निष्ठेला आपण महत्व देणारे कार्यकर्ते असल्याचे त्यांनी जाहीर करून राष्ट्रवादी शरद पवार गटाचा विश्वास संपादन केला होता. त्यांच्या या निष्ठेची दखल घेऊन त्यांना थेट इंदापूर तालुका राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सोशल मीडिया अध्यक्षपदी निवड करून पक्षाने न्याय दिल्याची भावना तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्ता व्यक्त करत आहे. निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित इंदापूर तालुका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सोशल मीडिया अध्यक्ष विजयकुमार गायकवाड यांनी सांगितले की, आपण भविष्यात पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण माने व इंदापूर तालुका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते शरदचंद्रजी पवार व संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांचे विचार तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे.