इंदापूर ता. 26 : गावच्या भल्यासाठी मेहनत घ्या,विकासकामाला निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.
भरणेवाडी येथे नवनिर्वाचित उप सरपंचांचा सत्कार समारंभ संपन्न झाला यावेळी श्री भरणे बोलत होते.
नुकत्याच पार पडलेल्या सहा ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आपल्याला अतिशय चांगले यश मिळाले असून सहा ग्रामपंचायती पैकी तब्बल पाच ग्रामपंचायती आपल्या विचाराच्या पॅनलने जिंकल्या आहेत.त्यामुळे तुमच्या सर्वांवरील जबाबदारी वाढली असून गावच्या भल्यासाठी सरपंच उपसरपंचासहित सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत तसेच निधीच्या बाबतीत लोकप्रतिनिधी म्हणून कसलीही कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
भरणेवाडी येथे आज सोनाली तुषार म्हेत्रे -शिंदेवाडी,
उदय सुभाष घोगरे – वकीलवस्ती,
नामदेव कोंडीबा वणवे – लाकडी,
मनीषा पपेश खराडे – काझड आणि
रेश्मा श्रावणकुमार जाधव- शेळगांव या नवनिर्वाचित उपसरपंचांचा सत्कार समारंभ आमदार भरणे यांच्या हस्ते पार पडला यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की खऱ्या अर्थानने राजकीय कारकिर्दीची पहिली पायरी म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक असते,आपले व्यक्तिमत्त्व,कर्तुत्व आणि सामाजिक कार्याचे प्रतिबिंब गावगाड्यामध्ये उमटत असते.त्यामुळे गावकऱ्यांच्या मनामध्ये विश्वासार्हता निर्माण करून अनेक ठिकाणीच्या आपल्या तरुण सहकाऱ्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरून यशाला गवासणी घातली असल्याने खऱ्या अर्थाने तुम्ही सर्वजण कौतुकास पात्र असल्याची शाबासकी देत आमदार भरणे यांनी अनेक मोलाचे सल्ले यावेळी दिले.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले कीआता ग्रामपंचायतींच्या निवडणुका संपल्या असून आता यापुढे आपसापसातील वाद-विवाद आणि मतभेद संपुष्टात आणून एक विचाराने गावच्या सर्वांगीण विकासासाठी मेहनत घ्या,जिथे-जिथे तुम्हाला अडचण येईल तिथे मी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे ऊभा असल्याचा विश्वास व्यक्त करत सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.तसेच वकीलवस्ती आणि शिंदेवाडी या ग्रामपंचायती पूर्वी विरोधकांकडे होत्या.परंतु त्या ठिकाणी सुद्धा परिवर्तन झाले असून या दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये आपण एकहाती सत्ता संपादीत केली आहे.त्यामुळे एकूणच आपली विजय घोडदौड चालूच असून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा प्रत्येक निवडणुकीत आपण घवघवीत यश संपादन केल्याशिवाय राहणार नाही,हा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील,छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मणराव शिंगाडे,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ,जंक्शनचे माजी सरपंच राजकुमार भोसले,युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर,महिला अध्यक्ष साधना केकान,कार्याध्यक्ष उज्वला परदेशी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.